Ration Card Holders: रेशनकार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. शासनाकडून मोफत धान्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. यामुळे, आता अशा लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे, तसेच त्यांचे रेशनकार्डही रद्द केले जाणार आहे.
ई-केवायसी का आहे आवश्यक?
शासनाने ई-केवायसीचा नियम अपात्र व्यक्तींना मिळणाऱ्या मोफत धान्याचा गैरवापर थांबवण्यासाठी लागू केला आहे. मागील एक वर्षापासून ही प्रक्रिया सुरू असून, याबद्दल वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या आहेत. तरीही, ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना आता ‘बोगस लाभार्थी’ ठरवून त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्याचा आणि धान्याचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन नियम आणि कारवाई
- रेशनकार्ड रद्द: ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांचे नाव रेशनकार्डमधून रद्द केले जाईल.
- धान्य बंद: यानंतर त्यांना धान्याचा कोणताही लाभ मिळणार नाही.
- गैरव्यवहारावर कारवाई: रेशनचे धान्य बाजारात विकणाऱ्यांवर आणि यामध्ये सहभागी असलेल्या रेशन दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल.
जिल्हा पुरवठा अधिकारी आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत संपली असली तरी, ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मात्र, ती कधीपर्यंत सुरू राहील याचा निर्णय लवकरच शासनस्तरावर घेतला जाईल. त्यामुळे, कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी ज्यांनी ई-केवायसी केली नसेल, त्यांनी त्वरित ती पूर्ण करून घ्या